‘वज्रादपि कठोरानि, मृदुनि कुसुमादपि’

मित्रानो, आज आपण महादजी शिंदे यांच्या जीवनाचा एक आगळावेगळा पैलू उलगडून पाहणार आहोत. महादजी शिंदे यांनी आयुष्यभर हातात तलवार धरली आणि लढाया केल्या हे सर्वास ठाऊक आहेच. परंतु ज्या हातात त्यांनी तलवार धरली त्याच हातात नित्यनियमाने स्मरणी सुद्धा धरली व सवड मिळेल तेव्हा त्याच हातात लेखणी सुद्धा धरली. भगवंताबद्दल मनातील प्रेम उचंबळून आल्यावर त्या भगवंतांचे गुणगान करणारी काव्यरचना केली. महादजींनी लढाईमध्ये जितक्या कठोरपणे शत्रूचा संहार केला होता, तितक्याच हळुवारपणे शरणागतांना अभयदान सुद्धा दिले होते. दिल्लीचा मोंगल सम्राट शहेनशहाची घोर विटंबना करणाऱ्या कपटी व क्रूर अशा गुलाम कादिरला त्यांनी पकडून त्याच्या देहाची विटंबना करून ठार केले होते व बादशहाच्या बेइज्जतीचा बदला घेतला होता. अशा तऱ्हेने वेळप्रसंगी वज्राहून कठोर वागणारे महादजी चातुर्मासात श्रीमदभागवताचा सप्ताह करीत असत हे खरे वाटणार नाही. म्हणूनच या लेखाला ‘वज्रादपि कठोरानि मृदुनि कुसुमादपि’ असे शीर्षक दिले आहे.महादजींच्या या आगळ्या वेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यावरील हा लेख!

पानिपतच्या लढाईनंतरचा काळ:सन १७६१, जानेवारी महिन्याचा तो काळ !पानिपतच्या युद्धात मराठ्यांची अतोनात हानी झाली होती. हजारो मराठ्यांनी जीव वाचवण्यासाठी समरांगण सोडून पळ काढला होता. लढाई संपून कित्येक महिने लोटले तरी अनेकांचा पत्ता लागत नव्हता. मराठ्यांची कुटुंबे डोळ्यात प्राण आणून त्यांच्या कर्त्यासवरत्या पुरुषांची रात्रंदिवस वाट पाहत होत्या. महादजी शिंदे देखील पानिपतावरून दक्षिणेकडे प्रयाण करणाऱ्या अशा सरदारांपैकी एक होते. निझामाच्या बीड महालाचा मातब्बर ठाणेदार सरदार सुलतानजी निंबाळकरांची भाची अन्नपूर्णाबाई ही महादजीची बायको होती. महादजीच्या बायकोस, अन्नपूर्णाबाईस मौजे खोकर मोह,परगणे जामखेड हा गाव त्यांनी आंदण म्हणून दिला होता.त्या गावाजवळ मौजे राममोह नावाचा गाव आहे. तेथे मन्सूरशहा अली नावाचा अवलिया फकीर राहत असे. त्या दर्ग्यामध्ये अन्नपूर्णाबाई जात असे व पानिपतच्या लढाईतून आपला पती सुखरूप परत येऊ दे म्हणून तेथील फकीराची दुवा मागत होत्या. आणि आश्चर्य म्हणजे काही दिवसात महादजी शिंदे दक्षिणेत सुखरूप परतले.मन्सूर शहानी महादजींच्या पत्नीची मन्नत पूर्ण केली होती, साहजिकच अन्नपूर्णाबाईंची त्यांच्यावर निष्ठा बसली आणि आपल्या पत्नीसोबत महादजी शिंदे देखील त्या फकिराची भक्ती करू लागले.

फकिरी दौलत: पानिपतच्या युद्धामध्ये शिंदे घराण्याचे मुख्य जनकोजी शिंदे यांनीही बलिदान केल्याने शिंदे घराण्याची जहागिरी कोणास द्यावी याबद्दल पेशवे दरबारात चर्चाचर्वण सुरु झाले.थोरले माधवराव पेशवे यांच्या मनात जहागिरी महादजींना द्यावी असे होते कारण ते राणोजी शिंदे यांचे पुत्र होते आणि जहागिरीला लायक होते. माधवराव पेशव्यांचे चुलते राघोबादादा याना ही जहागिरी मानाजी फाकडे या त्यांच्या मर्जीतील एका पुरुषास द्यावी असे शिजत होते. शेवटी माधवराव पेशव्यांच्या व दरबारातील इतर मातब्बरांच्या आग्रहावरून शिंदे घराण्याची गादी महादजींना देण्याचे ठरले. त्या सुमारास महादजी स्वतः बीडला आले होते आणि मन्सूर शहाच्या भजनी लागले होते.त्यांच्या कृपेनेच आपल्याला शिंदे घराण्याची गादी प्राप्त झाली म्हणून त्यांची मन्सूर शहावरील निष्ठा अधिक दृढ झाली. या घटनेमुळे शिंद्यांच्या जहागिरीचे नाव ‘फकिरी दौलत’ असे पडले असे म्हणतात.

प्रसाद म्हणून भाकरीचा तुकडा: पुढे काही महिन्यांनी सन १७६७ मध्ये महादजी हे ग्वाल्हेरच्या मोहिमेवर निघाले. तेव्हा मोहिमेवर निघायच्या आधी त्यांनी मन्सूर शहाचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला होता.फकिराने त्यावेळी त्यांच्या जवळील भाकरीचा एक तुकडा प्रसाद म्हणून दिला व ‘विजयीभव’ असा आशीर्वाद दिला होता.ग्वाल्हेरच्या मोहिमेत महादजींना यश आले व किल्ला सर झाला.अशा रीतीने महादजीचा उत्कर्ष होताच त्याने या फकीरास काही गांवे इनाम देऊन संतुष्ट केले. महादजीची आपल्या गुरुवर ’मन्सूर अली शहावर’ अतोनात श्रद्धा होती. दरवर्षी आणि जेव्हा त्याला आपल्या लढायांतून वेळ मिळेल तेव्हा ते गुरूच्या चरणी आपली सेवा बजावत असत. महादजी शिंद्यांचे अध्यात्मिक मार्गदर्शक व गुरु: महादजी शिंदे यांना संतपुरुषांचे व सत्संगाचे अतिशय वेड होते. त्यांनी आयुष्यात अनेक साधूसंतांना आपले गुरु केले होते. श्री. मल्लप्पा वासकर, सोहिरोबा आंबिये, रामदासी लक्ष्मण महाराज शिरगावकर,पैठण येथील नाथमहाराज अशा अनेकांना त्यांनी गुरुपद दिले होते.

संत मल्लप्पा यांची भेट: महादजी शिंद्यांच्या काळात वारकरी सांप्रदायात विख्यात विठ्ठलभक्त मल्लप्पा वासकर होऊन गेले. ते लिंगायत समाजातील अग्रणी वारकरी होते. एके दिवशी महादजींचा मुक्काम श्रीक्षेत्र पंढरपूर येथे असताना ते मल्लप्पा यांच्या भेटीस गेले. आता पर्यंत महादजीनी आपल्या शैलीनुसार व भाषा प्रतिभेला अनुसरून अनेक अभंग रचले होते. तसेच भग्वद्गीतेवर ‘माधवदासी’ नावाची ओवीबद्ध टीका सुद्धा लिहिली होती. संत मलप्पाची भेट झाल्यावर महादजीनी ही हस्तलिखिते संत मल्लप्पा यांच्या चरणी अर्पण केली आणि आपल्या काव्यासंदर्भात त्यांना अभिप्राय देण्याची नम्र विनंती केली. यावेळेस संत मल्लप्पा यांनी महादजींना योग्य तो उपदेश व काव्यासंबंधी मार्गदर्शन केले. संत सोहिरोबा आंबिये यांची भेट: सन १७७९ मध्ये धर्मपरायण सोहिरोबा आंबिये हे ग्वाल्हेर येथे त्यांच्या दरबारात आलेले असताना महादजी शिंदे यांनी आपली कविता त्यांना दाखवली. तेव्हा महादजींनी रचलेली कविता वाचून सोहिरोबा आंबिये म्हणाले होते की तुम्ही रचलेली कविता चांगली आहे खरी पण ती एव्हढी प्रासादिक नाही. त्यावेळी संत सोहोरोबा यांनी प्रासादिकता दाखवणाऱ्या भक्तिरसाने रसाळ अशा दोन कविता दरबारात सर्वासमक्ष उस्फुर्तपणे करून दाखवल्या.

संतकवी दत्तनाथ राक्षसभुवनकर यांची भेट : महादजींच्या काळातील एक संतकवी दत्तनाथ राक्षसभुवनकर याना देखील महादजींनी गुरु केले होते व त्यांना तर ते प्रत्यक्ष रणभूमीवर पण घेऊन जात असत. स्वामी दत्तनाथ महाराज यांनी महादजी शिंदे यांच्या समवेत मथुरा व ग्वाल्हेर येथे वास केला होता. पत्थरगढच्या लढाईतून जिंकून आणलेली ढोल वगैरे वाद्ये महादजीनी नाथांच्या उज्जैन येथील आश्रमात ठेवली असे म्हणतात.

महादजींची धार्मिक वृत्ती: महादजीचे चरित्र अभ्यासताना महादजी शिंदे हे आयुष्यभर भाविक वृत्तीने राहिले असे दिसून येते. महादजी शिंदे नित्य स्नान केल्यावर भाळावर टिळामुद्रा लावायला कधी विसरत नसत. तसेच त्यांच्या हातात नित्यनेमाने स्मरणी असे व कृष्ण भजनात ते तल्लीन असत. त्यांचे पूजापाठ व जप जाप्य हे अगदी ऐन लढाईच्या काळातसुद्धा न चुकता चालू असे. गुजराथमधील इंग्रजांच्या विरुद्ध चाललेल्या लढायात महादजी रात्रभर रणांगणावर व्यस्त असूनही सकाळी नित्यनेमाने स्नान व पाठपूजा करीत असत व त्यानंतरच त्यांचा उर्वरित दिनक्रम चालू होत असे.चितोडगढची स्थापना प्रभू रामचंद्रांचा पुत्र कुश याने केली अशी आख्यायिका आहे. त्यामुळे चितोडगडावर हल्ला करण्याचा प्रसंग महादजीवर आला, तेव्हा भाविकतेपायी चितोडच्या राण्याने किल्ल्यावरून तोफांचा मारा सुरु करेपर्यंत पाटीलबावांनी त्यांच्याविरुद्ध आपल्याकडील तोफा चालविल्या नाहीत असे सांगतात.

बाबा हबीबशहा यांचा उरूस: महादजी शिंदे यांनी बीड येथील गुरु बाबा मन्सूरअली याना आपल्या सोबत त्यांच्या राजधानीचे शहर ग्वाल्हेर येथे कायम वास्तव्यास येण्याची विनंती केली. पण या वेळी बाबानी आपण स्वतः न जाता आपल्या हबीबशहा या शिष्याला त्यांच्या बरोबर ग्वाल्हेरला पाठवून दिले. या हबीबशहास महादजीने ग्वाल्हेर येथे पन्नास हजार रुपयांची सालाना जागीर करून दिली. ती अद्यापि चालू आहे असे म्हणतात. हबीबशहा यांच्या गादीवरील इसम मयत झाल्यास त्यांचा चेला त्या गादीवर बसतो. या गादीची ‘श्री साहेब’ अशी संज्ञा असून प्रत्येक सरकारी कागदावर आरंभी हीच अक्षरे लिहीत असत. १९ ऑगस्ट १७७७ रोजी हबीबशहा हा फकीर मरण पावला. म्हणून १९ ऑगस्ट या दिवशी दरवर्षी ग्वाल्हेर येथे त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ उरूस भरतो, त्या निमित्ताने भंडारा व दानधर्म होतो. येथील उरूस अद्यापि चालू आहे असे वाचण्यात आले.

माधव विलास’नावाचा ग्रंथ: श्री समर्थ रामदास स्वामी यांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी यांचे ज्येष्ठ बंधू दत्तात्रय स्वामी यांचे वंशजांचा ग्वाल्हेर येथे ‘ आबा महाराजांचा मठ ‘ आहे,येथील संग्रहात महादजी यांच्या कवित्वाबद्दल खालील उल्लेख सापडला आहे असे म्हणतात. “माधव (महादजी) महाराजांवर कसबे जामगांवी श्री गोपाळकृष्णानी निष्ठाबळे प्रसन्न होऊन स्वप्नी आज्ञा केली की मी तुझे घरी येतो. माझ्या तीन मूर्ती सुवर्णमय ओतव्याव्या, ज्या प्रतिमेस शस्त्र असून आणि जी उत्तम स्वरूपात असेल तोच मी असे जाणून नित्य स्वतः पूजा आणि अष्टमीचा उत्सवप्रसंग जन्मापासून गोपाळकाल्यापर्यंत करावा.त्याप्रमाणे लीला श्रीमदभागवताचे आधारे चरित्र करीत जावे. असा उत्सव अखंड चालवावा. माझ्या प्रसारे तुला कवित्व स्फ़ुरेल.” अशी आज्ञा होताच ‘माधव विलास’ या नावाचा ग्रंथ रचून महादजी यांनी वर दिलेला नियम आमरण चालविला. ग्वाल्हेर येथील ग्रंथालय(राजपुस्तक संग्रहालय) मध्ये ‘माधव विलास’ नावाचा ग्रंथ आहे.

ग्रंथाच्या शेवटी लिहिले आहे की –

इति श्रीमन्महाराज राजमौली मुकुटमणी मरीची मंजरी-पिंजरी कृत पारपिठानां श्रीमन्महाराजाधिराज माधवेश सार्वभौमानां गीती प्रबंध कृतौ यदुकुल कुमदिवकाश प्रकाशित पराक्रमस्य भगवतो नंदानंदकंदस्य श्रीमन्माधवस्य कृष्णचंद्रस्य जन्माक्रीडादी वर्णनं संपुर्णम.

या ग्रंथाचा लेखनकाल असा दिला आहे – श्रीमद्विक्रम भूभजे गत शरतसंघेष्ट वेदाष्ट भू !१८४८ संख्य माधव कृष्ण पंचमि तिथौ ,वारे रवे:सुनूजे !! श्री मतपुष्कर तीर्थराज निकटे श्रीमाधवास्या ज्ञया !नाम्ना बालमुकुंद मिश्र इतियेंना लेख्यद :पुस्तकं !!

महादजींची काव्यसंपदा: महादजी शिंदे यांनी आपल्या काव्य रचनेत भक्तिगीते, ओव्या, कवने, पाळणे, अभंग असे वेगवेगळे काव्य प्रकार हाताळले. त्यांनी आपली काव्य प्रतिभा मराठी, हिंदुस्थानी तसेच संस्कृत इत्यादी भाषेत दाखवली. महादजींनी मराठी व हिंदी भाषेत(हिंदुस्थानी भाषेतील) मिळून एकूण २६५ रचना केल्या. त्यापैकी मराठीतील एकूण रचना १८९ आहेत तर हिंदीमधील ७६ रचना आहेत. मराठीतील रचना अध्यात्मपर, तसेच श्रीकृष्णजन्मावरील, गोपाळकाला इत्यादींचा समावेश आहे.हिंदी भाषेत गुरुस्तुती,श्रीकृष्णजन्मावरील काव्यरचना, व स्फुट कविता दिसून येतात. महादजींच्या बहुतेक सर्व कविता कृष्ण भक्तीच्या आहेत. एक-दोन रचना गुजरातीमध्ये ही आहेत.माळवा व विशेषतः राजस्थानात (नाथव्दार) कृष्णभक्तीचा महिमा मोठा आहे. महादजींचा राजस्थानाशी व्यवहार लक्षात घेता हा ठसा त्यांच्या भावविश्वावर उमटला यात नवल नाही.

त्यांच्या काव्यातील काही प्रसिद्ध काव्ये खालीलप्रमाणे:

श्रीकृष्णाची आरती:
ओवाळू आरती सद्गुरूपा, निजरूपी साहेब शुद्ध स्वरूपा IIधृ IIनिजबुबळी वाती उजळुनी ज्योती हृद्गत स्नेही भरुनी निजमाये I१Iनि यनिरामय अद्वय अव्यय भासेI कृपे तुझे नित्य वो माय I२Iनीळ पीत स्वेत पाहुनी निश्चितI माधवी आनंद नित्य विराजत I३Iअभंग:देवासी भेटोनि, बोलावेसे वाटे! आवडी गोमटे, रूप पाहू !!१!!बाळपणी मोठ्ठा, लागतसे छंद! आवडी गोविंद, दावा कोणी !!२!!सारी दर्शनासी, पुसता शिणलो! सत्संग मी नेलो , भाग्य योगे!!३!!जायचे संगती, पूर्ण लाभ झाला! सद्गुरू भेटला, मायबाप !!४!!कृपा अनुग्रह, वरदकर होता! तत्वमसि आत,माझा मी ची !!५!!जे जे पाहे ते ते, ब्रम्हरूप भासे! गोविंद हा दिसे, अखंडित !!६!!धन्य हा सत्संग, धन्य गुरुराणा! माधव देखणा, यांचे कृपे !!७!!

एक पराक्रमी रणझुंजार योद्धा ज्याने स्वतःचे सारे आयुष्य रणांगणावर घालवले, त्या शूरवीराने त्याच उत्कटतेने भक्तिगीते, आरत्या लिहाव्यात असे उदाहरण जगाच्या इतिहासात विरळच म्हंटले पाहिजे. भक्ती आणि शक्तीचा असा समसमा संयोग एकेठिकाणी असणारे महादजी हे इतिहासातील कदाचित एकमेव उदाहरण असावे असे वाटते.

संदर्भ:
1. सातारा इतिहास संशोधक मंडळाची ऐतिहासिक लेखमाला, लेखांक २९, ६ नोव्हेंबर १७७७,
2. जीवबादादांचे चरित्र लेखक: न. व्यं. राजाध्यक्ष, इतिहास संशोधनात्मक मासिक ‘भारतवर्ष’च्या जून १८९९अंक (वर्ष दुसरे अंक तिसरा),
3. महादजी शिंदे: लेखक विश्वास दांडेकर ,
4. राजकवी महाराज महादजी शिंदे उर्फ पाटीलबाबा आलीजबहाद्दर कृत कविता:संशोधक व संपादक भास्कर रामचंद्र भालेराव,
5. अलिजाबहादूर महादजी शिंदे यांचे चरित्र लेखक: विष्णू रघुनाथ नातू

संकलन व लेखन:प्रमोद करजगी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: