२८ जुलै १७८७, लालसोटचा रणसंग्राम

Maratha Artillery

जो जीता वही सिकंदर: तुम्हीच सांगा कोण सिकंदर?

मित्र हो, आज २८ जुलै २०२१. याच दिवशी बरोबर २३४ वर्षांपूर्वी उत्तर मराठेशाहीत एक महत्वाची लढाई झाली होती. ही लढाई इतिहासात लालसोटची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. खरं तर ही लढाई लालसोटच्या वायव्येस काही अंतरावर असलेल्या तुंगा गावच्या सपाट वाळवंटी मैदानात झाली होती. याच दिवशी महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मराठी फौजा राजपूत व मोंगल यांच्या एकत्रित सेनेशी राजस्थानच्या जुलै महिन्याच्या रणरणत्या उन्हात व रखरखीत वाळवंटात एकमेकांशी भिडल्या होत्या. तो दिवस होता २८ जुलै १७८७, वार होता शनिवार. सकाळी नऊ वाजता दोन्ही कडील तोफांच्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने व उडणाऱ्या धुळीने लढाईला तोंड फुटले होते आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस लढाई बंद करण्यात आली होती. कारण त्यावेळेस अचानक जोराचा पाऊस सुरु झाला आणि दोन्ही बाजूच्या सैन्याला रणांगणावर हालचाल करणे अवघड होऊन बसले होते. त्यामुळे नाईलाजास्तव दोन्ही फौजा आपापल्या तळावर परतल्या. दुसरे दिवशी मराठे लढाईस बाहेर पडले, परंतु राजपुतांचा पक्ष लपलेल्या खंदकातून बाहेर पडलाच नाही. आणि त्यानंतर म्हणावी तशी लढाई झालीच नाही. कारण मराठ्यांच्या फौजेत फितुरीची या आधीच झालेली लागण बाहेर आली आणि त्यांचे फितूर झालेले शिपाई राजपूत सेनेला जाऊन मिळाले. आणि महादजी व त्यांचे सरदार यांना हतबलपणे व हताशपणे हा तमाशा बघण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आणि त्यानंतर सुरु झाली मराठ्यांची एक अविस्मरणीय ‘यशस्वी ‘ माघार! साधारण १ ऑगस्ट १७८७ पासून मराठ्यांनी अत्यंत शिस्तीत माघार घेण्यास सुरुवात केली. ती माघार १० ऑगस्ट सुमारास सुरक्षित स्थळी पोचल्यावरच थांबली. दोन्हीही पक्ष तुल्यबळ असल्याने ही लढाई एव्हढी भीषण झाली की मराठ्यांच्या उत्तरेतील अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले. म्हणूनच या लढाईला इतिहासामध्ये मराठयांचे दुसरे ‘पानिपत’ असे संबोधण्यात आले.२८ जुलै या दिवसाची स्मृती ताजी करण्यासाठी हा लेखन प्रपंच!!

लालसोटच्या लढाईचे वैशिष्ट्य म्हणजे २८ जुलैच्या रणकंदनानंतर नंतर मराठयांची खात्री झाली की ही लढाई त्यांनी जिंकली तर राजपूत सैन्य आपणच ही लढाई जिंकली म्हणून उत्सव करण्यात मश्गुल झाली. या लढाईत खरे कोण विजयी झाले हे गुलदस्त्यात आहे असे म्हणावे वाटते कारण  याच्या निष्कर्षाविषयी अनेक मतांतरे आहेत. म्हणून या लेखाचे शीर्षक ‘जो जिता वही सिकंदर’ असे मुद्दामच दिले आहे. वाचक हो आपणच या लढाईत कोण ‘सिकंदर’ ते ठरवा.

लढाईची थोडक्यात पार्श्वभूमी: नोव्हेंबर १७८४ मध्ये महादजी शिंदे यांना दिल्लीच्या मोंगल सम्राटाने वकील इ मुतलक’ हा मोंगल साम्राज्याचा सर्वोच्च किताब दिला आणि मोंगल साम्राज्याचा पूर्ण कारभार मराठ्यांच्या ताब्यात आला. राजस्थानातील जयपूर, जोधपूर इत्यादी संस्थानचे राजे मराठ्यांना चौथाई देण्यास बांधील होते. तसेच ते मोंगल बादशहाचे मंडलिक असल्याने त्यांच्यात बादशहाला पण ठराविक रक्कम देण्याचा करार झालेला होता. महादजी आता मोंगल बादशहाचा प्रमुख कारभारी झाल्याने दोन्ही वसुली करण्याची जबादारी महादजीवर येऊन पडली. त्यामुळे साहजिकच महादजींनी जयपूरच्या व जोधपूरच्या राण्याकडे वसुलीसाठी तगादा लावला. त्यावेळचा जयपूरचा राणा सवाई प्रतापसिंग हा वयाने लहान, व्यसनी, दुर्बल व अनुनभवी असल्याने राज्यकारभारावर त्याचे नियंत्रण नव्हते. खंडणी मागणाऱ्या मराठ्यांना तोंड देखली थोडीशी रक्कम देऊन बाकीची नंतर देण्याचा वायदा करून मार्गी लावावे असे त्याचे बरेच वर्षे धोरण होते. सन १७८७ मध्ये ज्यावेळी महादजी स्वतः जयपुरवर चालून गेले तेव्हा जयपूरच्या राण्याने खंडणी न देता मराठ्यांशी सरळ दोन हात करण्याचे ठरवले व त्या दृष्टीने सैन्याची जमवाजमव सुरु केली. जोधपूरच्या राजा देखील मराठ्यांच्या ससेमिऱ्याला कंटाळला होते तेव्हा त्याने सुद्धा जयपूरकरांना मदत देण्याचे मान्य केले. महादजी शिंदेंची मात्र यावेळी हालत खस्ता झाली होती कारण त्यांच्याकडे पैशाची टंचाई होती. बादशहाचे दरमहा लाख रुपयाचे देणे ७-८ महिने थकलेले होते. महादजींच्या सैन्याचा पगार कित्येक महिने थकला होता. दिल्ली व अंतर्वेदीत गेले तीन वर्षे दुष्काळ पडल्याने पुरेशी वसुली झाली नव्हती. आणि सैन्यात अन्नधान्याची टंचाई झाल्याने कमालीची महागाई झाली होती. त्या सुमारास पुण्याची फौज टिपू विरुद्ध कर्नाटकात लढाईवर गुंतल्याने पुण्यातून मदत येण्याची शक्यता मावळली होती. अशा स्थितीत शिंद्यानी माघार घ्यावी असे बादशाहासकट अनेकांनी सुचविले, परंतु राजपुतांचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा असे महादजीच्या मनात पक्के झाले होते. त्यातच महादजीचा मित्र अल्वरचा राजा प्रतापसिंग याने महादजीला राजपुतांबरोबर लढाई करण्यास भरीस घातले. जयपूरकडून किरकोळ खंडणी घेउन माघारी जाणे हे बादशहाच्या वकील इ मुतलक याना शोभत नाही वगैरे सांगून हरभऱ्याच्या झाडावर चढवले होते. त्यावेळेस महादजीच्या हाताखाली असलेला मोंगल सरदार महम्मद बेग हमदानी हा जयपूरच्या राण्यांच्या पैशाच्या अमिषाला बळी पडला व त्याने महादजीची साथ ऐनवेळी सोडली. तरीसुद्धा अशा कठीण परिस्थितीत महादजींनी राजपुताना धडा शिकवण्याचा निर्धार कायम ठेवला होता. 

अशा प्रकारे महादजीच्या नेतृत्वाखाली मराठे एका बाजूला तर विरुद्ध पक्षात जयपूरचा राणा सवाई प्रतापसिंग, जोधपूरचा राणा बिजयसिंग आपापले सैन्य घेऊन एकत्र आले होते आणि त्यांच्या साथीला शूर व कसलेला मोंगल सेनापती हमदानी होता. राजपुतांची एकत्रित फौज सुमारे ५० हजार झाली होती. त्यामध्ये ५ हजार कडवे राठोड सैन्य होते जे जिंकू किंवा मरू असा निर्धार करून लढाईत उतरले होते. महादजीकडे विश्वासू राणेखान भाई, रायाजी पाटील, खंडेराव हरी, फ्रेंच सेनापती डी बॉयन, मुर्तझाखान बरेख, शिवाजी विठ्ठल व अंबुजी इंगळे असे अनुभवी सरदार आपले सैन्य घेऊन सामील झाले होते.

२८ जुलै १७८७, लालसोटचा रणसंग्राम (The D day ): लालसोटच्या मुख्य लढाईच्या  महिनाभर आधीपासून दोन्ही पक्षात किरकोळ चकमकी व धुसफूस सुरु होती. दोघेही एकमेकांच्या शक्तीचा अंदाज घेत होते. एकमेकांची कुमक छापा घालून लुटणे , एकमेकांची गुरेढोरे पळविणे असे प्रकार महिनाभर चालूच होते. मुख्य लढाई होण्यास शनिवार, २८ जुलै उजाडला. त्या दिवशी महादजींनी आपली सैन्य रचना मोठ्या खुबीने केली होती. डाव्या बगलेवर डी बॉयन यांचा तोफखाना व कवायती फौजेच्या तीन पलटणी होत्या. त्याच्या संगत खंडेराव हरी आणि मुर्तझाखान हा तोफखान्याचा मुख्य होता. मधल्या फळीवर नजफखानाचे वेठबिगार अफगाण शिपाई होते तर उजव्या बगलेवर स्वतः राणेखान भाई, फिरंग सेनापती लेस्टीनो , काझो ,जॉन बाप्टिस्ट व ला फानोस तसेच अल्वरचा राजा माचेडीकर यांची फौज होती. शत्रूच्या बाजूने उजव्या बगलेवर जोधपूरचा शूर सेनापती भीमसिंग राठोडांची सेना होती, मधल्या फळीवर जयपूरचे सैन्य त्यांच्या लांब पल्ल्याच्या (heavy artillery) तोफखान्यासहित होते आणि डाव्या फळीवर अनुभवी सेनापती मोहम्मद बेग हमदानी होता.

लालसोटच्या लढाईचे संक्षिप्त वर्णन: लढाईला आरंभ करायच्याआदल्या दिवशी महादजींनी सायंकाळी एकाग्रपणे व भक्तिभावाने रणचंडीच्या पुजार्चनास सुरुवात केली. उषकाळ होण्याच्या आधी तीन तास आधी आपल्या सैन्यातील सर्वात थोर व शूर अशा राणेखान भाई या सर्वोच्च सेनापतीस बोलावून घेतले. त्यास उदकाने स्नान करायला लावून त्याला नवीन पोशाख घालण्यास दिले देवतांसमोर नतमस्तक होऊन साष्टांग नमस्कार घालण्यास सांगितले. नुकत्याच आटोपलेल्या होमहवनातील विभूती त्याच्या कपाळी लावली. व त्याला शिंद्यांची समशेर व ढाल यांच्या छायेत यशस्वी भव असा संदेश देऊन रणभूमीवर कूच करायला सांगितले.

२८ जुलैच्या सकाळी शिंद्यांचा वरिष्ठ सेनापती राणेखान बिडाखा येथे मोरेल नदी ओलांडून तुंगाच्या दिशेने २मैल कूच करून, पश्चिमेकडून पूर्वेकडे १मैल त्याने आपली सैन्याची फळी उभी केली. राजपुतांपेक्षा हलक्या असलेल्या बंदुका त्याने पुढे ठेवलेल्या होत्या, त्या बंदुका वाळूत खड्डे करून सुरक्षित ठेवल्या होत्या. राजपुतांनी सुद्धा आपल्या फौजेची रचना हुशारीने केली होती, त्यांनी जमिनीत खंदक करून आपला  तोफखाना ठेवला होता. सकाळी ९ वाजता लढाईला तोंड फुटले. राजपुतांच्या कडे लांब पल्ल्याच्या तोफा होत्या त्यामुळे त्यांनी मारलेले गोळे मराठ्यांना लागून त्यांचे सैनिक व घोडे मोठ्या प्रमाणात जायबंदी होऊ लागले.त्यामानाने मराठ्यांच्या तोफांचा पल्ला कमी होता व गोळे राजपुताकडे पोचत नव्हते. ही बाब महादजींच्या लक्षात आल्याबरोबर महादजींनी मोठ्या आकाराच्या चार तोफा पुढच्या फळीवर आणून ठेवल्या आणि तोफांचा भडीमार सुरु केला. त्यामुळे राजपूत घोडेस्वारांची कत्तल होऊ लागली. सुरुवातीस दोन्ही बाजूंच्या काही तासांच्या तोफांच्या गोळागोळीनंतर सुमारे ११च्या सुमारास घोडदळ व पायदळ यांचे हातात हत्यार घेऊन लढाईला तोंड फुटले. राजपुतांच्या उजव्या बगलेवार प्राणार्पणासाठी तयार असलेल्या ४ हजार राठोड घोडेस्वारांनी मराठ्यांच्या डाव्या बगलेवर जोरदार हल्ला चढवला. मराठ्यांच्या बंदुकांच्या सततच्या गोळाबारीला व त्यामुळे झालेल्या प्राणहानीला न जुमानता त्यांनी बंदूकधाऱ्यावर हल्ला चढविला. बंदूकधाऱ्याना अस्ताव्यस्त करून त्यांनी मराठ्यांच्या डाव्या फळीचे कंबरडे मोडले. राठोडांच्या या हल्ल्यात शिंद्यांचे शेकडो नागा आणि अफगाण सैनिक ठार झाले. अगदी डी बॉयनच्या पलटणींचे सुद्धा काही चालले नाही आणि सैनिकांना बंदुकांचे काही बार उडवून मागच्या मागे परतणे भाग पडले. डी बॉयन याने मागे सरकून आपल्या खचलेल्या सैनिकाना परत एकत्र केले व त्यांनी पुन्हा गोळीबार चालू केला. राणेखान याने डाव्या बगलेवर मराठ्यांची ताज्या घोडदळाची कुमक मागे सरकणाऱ्या सेनेच्या मदतीसाठी पाठवली आणि डाव्या बगलेवर चढाई पुन्हा सुरु केली. बऱ्याच वेळ चाललेल्या या रक्तरंजित लढाईनंतर राठोडांच्या फौजेला मागून रसद न आल्याने त्यांची शक्ती क्षीण होत गेली आणि त्यांच्या घोडदळाने मिळवलेली आघाडी त्यांच्या हातातून अलगद निसटली. शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली. राठोडांच्या मृत सैनिकांची संख्या हजारापर्यंत पोचली तर मराठ्यांचे तीनशे सैनिक मरण पावले. परंतु राजपुताना सर्वात मोठा धक्का बसला म्हणजे डाव्या बगलेवर लढणारा मोंगल सरदार महम्मद बेग हमदानीस तोफेचा गोळा लागून तो मरण पावला. त्यामुळे राजपुतांच्या सैन्याचे कंबरडेचे मोडले. हमदानीवर त्यांची खूप मदार होती आणि तोच अचानक ठार झाल्याने त्यांची शक्ती कमकुवत झाली. जयपूरकडील कच्छवे व महादजीचे सैनिक हातघाईच्या संग्रामात एकमेकांशी भिडले परंतु संध्याकाळी अचानक पाऊस सुरु झाला. रणांगणावरील सैन्याच्या हालचाली दोघांनाही  जड जाऊ लागल्या. त्यामुळे मराठे व राजपूत दोन्ही फौजा आपल्या तळावर परतल्या. शिंद्यानी शत्रूच्या तोफा वा बंदुका काबीज केल्या नाहीत तसेच आपल्याकडील ही शत्रूला हिसकावून घेऊ  दिल्या नाहीत. सायंकाळी आपल्या पुढच्या फळीतील चौक्या शाबूत ठेऊन प्रत्येक जण आपल्या छावणीत परतले.

२९ जुलै आणि त्यानंतरचा घटनाक्रम: २८ जुलै १७८७ रोजी सांयकाळी दोन्ही फौजा आपापल्या तंबूत परतल्या. हमदानी मृत्युमुखी पडल्याचे वृत्त मराठ्यांना रात्री खूप उशिरा समजले. २९ जुलै १७८७ रोजी रविवार होता. सकाळी मराठे लढाईच्या उद्देशाने शत्रूवर चाल करून जाण्याच्या बेतात होते, परंतु राजपूत व राठोड आपल्या खंदकातून बाहेरच आले नाहीत. नंतर हमदानीचे मृत्यूनंतरचे क्रियाकर्म उरकण्यासाठी प्रतापसिंगाने तीन दिवसाचा युद्धविराम जाहीर केला. त्यामुळे मराठे आपल्या छावणीत परतले आणि ३० जुलै नंतर लालसोट येथील खऱ्या नाटकास सुरुवात झाली. ते नाटक म्हणजे महादजीकडील उत्तरेकडील जे सैनिक होते ते थकलेल्या पगारासाठी बंड करून उठले व त्यांनी लढाईस नकार दिला. महादजींच्या सरदारांनी व खुद्द महादजींनी त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण तो विफल ठरला. त्यामुळे उत्तरेतील सुमारे सात हजार फौज आपल्या बंदुका, तोफा व दारूगोळा घेऊन राजपुतांच्या लष्करी मुक्कामाकडे चालू पडली. मराठ्यांच्या दृष्टीने या मोहिमेतील हा सर्वात मोठा धक्का होता. आपल्या डोळ्यादेखत आपल्या गोटातील सैन्य उठून शत्रू पक्षाकडे चालू लागते या घटनेमुळे मराठ्यांचे मानसिक खच्चीकरण झाले असेल तर त्यात नवल कसले! महादजीवरील हा प्रसंग आणीबाणीचा होता. मराठ्यांना त्यांच्याच बाजूचे हिंदुस्थानी सैनिक आपले शत्रूवर वाटू लागले. ते आपल्यावर कधी हल्ला करतील अशा आशंकेने ते बेचैन झाले. खायला दोन घास अन्न नाही, खिशात दमडी नाही आणि आपल्या लष्करात झालेली फितुरी यामुळे मराठे सैन्य हादरून गेले. त्यावेळी महादजी व त्यांचे वरिष्ठ सल्लागार, सेनापती यांची बैठक होऊन त्यांनी दिलेला माघारी जाण्याचा सल्ला महादजींनी त्वरित मान्य  केला. आणि मग सुरु झाली एका यशस्वी माघारीची गाथा! अशा तऱ्हेने ३१ जुलै १७८७ रोजी शिंद्यांना माघार घेणे भाग पडले.

उत्तर मराठेशाहीतील एक यशस्वी माघार: मराठे हे आजता गायत एक आक्रमक, चपळ व त्यांच्या अंगभूत धाडस व शौर्याबद्दल इतिहासात प्रसिद्ध होते, परंतु यावेळी परिस्थितीच्या रेट्यापायी नाईलाजाने व मनुष्यहानी वाचवण्यासाठी त्यांना रणभूमीपासून माघार घेत दूर जाणे भाग पडले. महादजीच्या नेतृत्वगुणाची यावेळी कसोटी लागली होती. कारण त्यांचे जवळपास ४० हजारापेक्षा अधिक सैन्य फारशी हानी होऊ न देता त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याची जबाबदारी त्यांच्या शिरावर होती.महादजी आपली मनाची स्थिरता अजिबात ढळू न देता, संयम दाखवत मराठयांना सुखरूप परत आणले. यासाठी ते स्वतः संपूर्ण सैन्यभर सतत हालचाल करीत होते.पाठीमागून राजपुतांच्या संभाव्य हल्ल्यापासून रक्षण व्हावे म्हणून त्यांनी उचित सैन्य रचना केली होती. शक्यतो तितक्या लांबलांबच्या मजला मारत ते आपल्या स्नेह्याच्या म्हणजे अलवारचा राजा प्रतापसिंग यांच्या राज्यात येऊन पोचले.११ऑगस्ट१७८७ रोजी डिगेजवळ सिसवाडा येथे सुरक्षित स्थळी येऊन थांबले.या माघारीबद्दलची सविस्तर वर्णने इतिहासात सापडतात. या वर्णनास न्याय द्यायचा म्हंटले तर या संबंधात एक वेगळा लेखच लिहावा लागेल.  

Rana Sawai Prataap Singh

जीत मराठ्यांची का राजपुतांची??? मित्रानो, आपल्या या लेखाच्या कळीच्या मुद्द्याशी आपण येऊन पोचलो आहोत.पहिल्या दिवशीची म्हणजे २८ जुलै १७८७ दिवशीची लढाई पर्जन्य वृष्टीमुळे थांबली, पण ती संपली म्हणता येणार नाही. आणि दुसरे दिवशी लढाई झालीच नाही. त्यानंतर सुरु झाला तो घरफितुरीचा सिलसिला आणि उत्तरेतील असंतुष्ट सैनिकांच्या झुंडीच्या झुंडी मराठ्यांचा पक्ष सोडून राजपूतच्या बाजूला निघून गेल्या. आणि मग सुरु झाली  मराठ्यांची माघार! अशा या घटनाक्रमामध्ये जय कोणाचा झाला म्हणायचा? अशा व्दिधा मनःस्थितीत  त्यावेळच्या विविध ऐतिहासिक कागदपत्रांचा व ग्रंथाचा आधार घेणे उचित होईल.

मराठ्यांकडील व राजपुताकडील काही ऐतिहासिक आधार: लालसोटच्या लढाईच्या दरम्यान अनेक मराठी वकिलांनी पाठवलेल्या पत्रातून एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते ती म्हणजे मराठ्यांनी राजपुतांचा बिमोड केला आणि मराठे विजयी झाले. उदाहरणार्थ, शिंदेशाहीच्या इतिहासाची साधने भाग १२, तसेच महेश्वर दरबारची पत्रे भाग २ यामधून मराठ्यांनी जय मिळवला असे स्पष्ट शब्दात म्हंटले आहे. अनेक मराठी ऐतिहासिक ग्रंथातून असाच सूर दिसून येतो.शत्रुपक्षाकडील म्हणजे राजपुतांकडील जे दोन ऐतिहासिक ग्रंथ मिळले त्यामध्ये राजपुतांचा जय झाला व त्यांनी मराठ्यांना हाकलून लावले असे म्हंटले आहे. याचे उदाहरण म्हणजे हनुमान शर्मा यांचे ‘जयपूरका इतिहास’ व गौरीशंकर हिराचंद ओझा यांचे ‘जोधपूरका इतिहास’. अशा प्रकारे लढाईत भाग घेतलेल्या दोन्ही बाजूंचे म्हणणे होते की विजय त्यांचाच झाला. इतिहासकार कर्नल टॉड यांच्या राजस्थानचा इतिहास या ग्रंथात सुद्धा राजपुतांनी विजय मिळवला असे म्हंटले आहे.

अपक्ष जाणकारांचे मत: सुदैवाने या लढाईबद्दल काही अपक्ष बाजूंचे (third umpire?) काय म्हणणे आहे ते समजण्यासाठी काही संदर्भ उपलब्ध आहेत. सर यदुनाथ सरकार रचित ‘मोंगल साम्राज्याचा ऱ्हास’ या ग्रंथात लालसोटच्या लढाईत कोणालाच जय मिळाला नाही असे मत दिले आहे. या उलट लालसोटच्या लढाई संदर्भात ‘इब्रतनामा’ मध्ये लढाईच्या जय पराजयाबद्दल कोणतेच मत व्यक्त केलेले नाही.’पर्शियन रेकॉर्ड ऑफ मराठा हिस्टरी’ या पुस्तकात ही लढाई अनिर्णित झाली (stalemate)असे मत व्यक्त केलेले आहे. ‘पुणे रेसिडेन्सी करस्पॉन्डन्स’ या पुस्तकात या संदर्भात गंमतीदार निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यात लेखकाने म्हंटले आहे की रणभूमीवर उपस्थित असणाऱ्या त्यांच्या हरकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जय राजपुतांचा झाला पण उंटावरील सांडणीस्वाराचे म्हणणे आहे की विजय मराठ्यांचा झाला !! ‘मराठे व राजपूत यांचे संबंध’ या विषयावरील तज्ञ जाणकार डॉक्टर चंद्रकांत अभंग यांच्या भारत इतिहास मंडळाच्या त्रैमासीकातील लेखामध्ये या लढाईला ‘एक अनिर्णित’ लढाई असे शीर्षक दिलेले आहे.

मित्रानो, या लढाईच्या निष्कर्षांसंदर्भात आपल्याला काय वाटते? या लढाईत मराठ्यांचा जय झाला का राजपूत सेनेचा का ही एक अनिर्णित लढाई झाली? आपणच सांगा कोण आहे सिंकदर??

संदर्भ: टॉडकृत राजस्थानचा इतिहास, Persian records of Maratha History ,Part II, Sindhia as Regent of Delhi  by Sir Jadunath Sarkar, पुणे रेसिडेन्सी करस्पॉन्डन्स भाग १, जोधपूरका इतिहास: गौरीशंकर हिराचंद ओझा, जयपूरका इतिहास: हनुमान शर्मा, शिंदेशाहीच्या इतिहासाची साधने भाग १२,महेश्वर दरबारची पत्रे भाग २, भारत इतिहास संशोधक मंडळ त्रैमासिक वर्ष ८४, अंक १ ते ४, मोंगल साम्राज्याचा ऱ्हास:खंड ३,पृष्ठ २३६ लेखक:सर यदुनाथ सरकार, मराठी रियासत खंड ७ :ले.सरदेसाई गो.स.           

संकलन व लेखन: प्रमोद करजगी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: