मराठेशाहीतील जखमी सैनिकांची व्यवस्था आणि आयसओ ९०००

मराठेशाहीतील सैनिकांच्या पगाराच्या पद्धतीबद्दलचा माझा मागील लेख वाचून माझ्या काही हितचिंतक मित्रांनी व वाचकांनी त्या संदर्भात काही प्रश्न व शंका उपस्थित केल्या. त्या वाचून मला ही बरं वाटलं.कारण याचा अर्थ तुम्ही माझा लेख लक्षपूर्वक वाचत आहात याचे हे एक प्रमाणपत्र होते. काहीं वाचकांनी शंका विचारली की लढाईत जखमी झालेल्या सैनिकांना पगार मिळायचा का? व मिळाल्यास त्याचे स्वरूप व प्रणाली कशी होती ? तसेच लढाईत शाहिद झालेल्या सैनिकांच्या वेतनाचे काय होत असे? लढाईत ‘मृत’ पावलेल्या सैनिकांच्या पगाराबद्दल प्रश्न करणारे वाचक निश्चितच ‘जागृत’पणे लेखाचे वाचन करीत होते यात शंका नाही.

त्या अनुषंगाने इतिहासाचा धांडोळा घेताना लढाईत जखमी झालेल्या किंवा मृत पावलेल्या सैनिकांबद्दलचे काही उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात आढळले आणि ते निश्चितच त्या काळात सुद्धा मराठेशाहीत आपल्या सैनिकांची कशी पुरेपूर काळजी घेतली जायची त्याचे ते द्योतकच होते. सैन्य हे नेहमी पोटावर चालते अशी आपल्याकडे एक फार जुनी म्हण आहे, मग तो लढणारा सैनिक असो वा जखमी झालेला! मराठ्यांच्या लढायांचा अभ्यास करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने वाटते ती म्हणजे त्या काळात जर आयसओ ९००० (ISO9000) प्रकारचे एखादे जागतिक कीर्तीचे प्रमाणपत्र असते तर मराठे सैन्याला सहज मिळाले असते. मी असे का म्हणतो त्याचे विवेचन पुढे देत आहे.

सैनिक भरतीची प्रक्रिया: मागच्या लेखात म्हंटल्याप्रमाणे मराठ्यांच्या फौजेत प्रत्येक सैनिकाची रीतसर पद्धतीने फौजेत भरती (recruitment process based on skills profile, past experience etc.) केली जायची. सैनिकाचे नाव, गांव, वय,जात,तसेच स्वतःचा घोडा आहे किंवा नाही, सैनिक कोणत्या प्रकारचा आहे, पायदळ का घोडदळ का बंदूकधारी का धनुर्धारी का दाणपट्ट्याने लढणारा इत्यादींची नोंद केलेली असे. तसेच त्याचा मोहिमेतील ठरलेला पगार, त्याला दिलेली अग्रीम रक्कम (ऍडव्हान्स) याचा सुद्धा उल्लेख नोंदवहीत असे.



जखमी सैनिकांच्या उपचाराची प्रक्रिया:
जखमी सैनिकास उपचार करताना एक ठरलेली पद्धत मराठे अंमलात आणीत असत. ही पद्धत एखाद्या आयसओ प्रक्रियेसारखीच होती. लढाईत सैनिकाला जर इजा झाली तर त्याला मुख्य लढाईतून बाजूला काढून त्यांची लगेच नोंद केली (Incident recording ) जायची. त्याला झालेल्या जखमेबद्दल नोंद झाल्यावर त्याचे विश्लेषण (incident analysis) केले जायचे. झालेली जखम ही कशामुळे झाली याची शहानिशा ( causal analysis)करून त्यानुसार उपाय योजना ( solution) केली जात असे. जखम ही तलवारीची आहे, का भाल्यामुळे, का दगड धोंडे लागून का बंदुकीच्या गोळीमुळे झाली आहे याचे विश्लेषण (severity classification)केले जात असे. झालेली जखम ही किरकोळ आहे का घातक स्वरूपाची आहे याचे योग्य असे मूल्यमापन(sort of classification A, B or C class severity, class A :sever, class C: minor) केले जात असे व त्यानुसार औषधोपचारांच्या उपाय योजना आमलात आणल्यात जात असत असे दिसते. त्या दिवसाची लढाई संपल्यावर जखमी व मृत सैनिकांचा लेखाजोगा मांडला (end of the day report ) जात असे. दिवसाच्या अखेरीस इतके सैनिक जखमी व अमुक इतके मृत अशी आकडेवारी तयार केली जात असे व तो लेखाजोगा वरिष्ठांकडे पाठवला (reporting to senior leaders ) जात असे. जखमी व मृत सैनिकांचा आकडा रोजच्या रोज पुण्यास (मुख्यालय, head office) देखील लेखी स्वरूपात कळवला जात असे. मराठ्यांच्या सैन्यातील अशा प्रकारची अचूक पद्धती( full proof system) पाहिल्यावर त्यांना आयसओ समान प्रमाणपत्र मिळणे त्या काळात सुद्धा अजिबात अवघड नव्हते असे वाटते.


जखमी सैनिकांची व्यवस्था :
सैनिक लढाईत जखमी झाल्यावर त्याच्यावर वैद्य किंवा हकीम यांजकडून योग्य तो उपचार केला जात असे. जखमेच्या स्वरूपानुसार त्याला आवश्यक ती औषधे दिली जात. तसेच त्याची शारीरिक स्थिती पाहून वैद्याच्या सल्ल्यानुसार बरा होईपर्यंत त्याला आवश्यक तेव्हढी पगारी विश्रांती (paid leave) दिली जात असे. त्या वेळेस त्याचा नेहमी मिळणाऱ्या पगाराची निम्मी किंवा एक त्रितीयांश रक्कम पगार म्हणून दिली जात असे. घातक इजेमुळे सैनिक बरेच दिवसाचा जायबंदी राहणार असेल तर त्याचा रोजमुरा (daily wages)काही दिवस चालू ठेवला जात असे. बऱ्याच वेळेस सैनिकांना ते जर नजीकच्या भविष्यात लढण्यास उपयोगी पडणार नसतील तर त्यांची रवानगी सुरक्षित स्थळी केली जात असे. उदाहरणार्थ महादजी शिंदे यांचे लढाईत घायाळ झालेले सैनिक ग्वाल्हेर येथील लष्करी छावण्यात (sort of military command hospital) उपचारासाठी व विश्रांतीसाठी पाठवले जात असत.


मृत सैनिकांचे वेतन:
लढाईत मृत पावलेल्या सैनिकांना त्यांच्या हुद्द्यावर वेतन दिले जात असे. हे रोख रकमेच्या स्वरूपात किंवा एखाद्या इनामाच्या स्वरूपात असे. कधी कधी पिढीजात स्वरूपाची जहागिरी किंवा जमीन बहाल केली जात असे. मृत सैनिकांवर त्यांच्या धर्मानुसार अंत्यविधी केला जात असे. वरच्या हुद्द्यावरच्या अधिकाऱ्यांचा त्यांच्या हुद्द्याला योग्य असा अंत्यविधी केला जात असे. उदाहरणार्थ नरवीर दत्ताजी शिंदे बुराडी येथील लढाईत मारले गेले तेव्हा त्यांचे शव ताब्यात घेतल्यावर त्यांच्या लोकांनी तुळस, चंदन इत्यादी काष्ठे गोळा करून नदीकिनारी हिंदू पद्धतीने अंत्यविधी केल्याचे इतिहासात नोंदलेले आहे.


मराठेशाहीतील जखमी सैनिकांच्या पगाराबद्दलची मराठ्यांच्या इतिहासातील उदाहरणे:
आपाजी राम दाभोलकर यांच्या, तारीख २२जुलै१७९० च्या एका पत्रात राजस्थानातील पाटण येथील लढाईतील जायबंदी सैनिकांची तपशीलवार माहिती दिली आहे. पाटण येथे महादजीचे सैन्य व मोंगल सरदार इस्माईल बेग यांच्यात झालेल्या लढाईत मराठ्यांच्याकडील एकूण ३६१ सैनिक जाया झाले. त्यापैकी ३०९ जखमी व ५२ ठार झाले.३०९ जखमी पैकी ७२ तलवारीच्या वाराने, ३४ भाल्याच्या हल्ल्याने, ९ बर्चीच्या हल्ल्याने, ६ बाण लागल्याने, १५१ बंदुकीच्या गोळीमुळे व उरलेले ३१ दगडाच्या माऱ्यामुळे जखमी झाले अशी तपशीलवार माहिती दिली आहे. एव्हढेच नव्हे तर या लढाईत १७३ घोडी जाया झाली, त्यापैकी ६९ ठार झाली तर बाकीची वेगवेगळ्या कारणाने जखमी झाली असे म्हंटले आहे.
राजस्थानातील कोटा संस्थान येथील शिंदे सरकारचे वकील गुलगुले यांच्या एका पत्रामध्ये जयाजी शिंदे आपल्या पदराच्या माणसांची कदर किती करीत व त्यांची कशी काळजी घेत याबद्दलची माहिती दिली आहे. उदाहरणार्थ जयाजी शिंदे यांच्या फौजेतील एक सैनिक चांदखान हा लढाईत जखमी झाल्यावर तो बरा होईपर्यंत पगार ठरवून दिला होता.चांदखान याला १२ रुपये दरमहा जखम बरी होईपर्यंत द्यावेत व त्यानंतर रोज ४ रुपये या प्रमाणे वीस दिवस द्यावेत असा आदेश दिलेला होता. राजजी गायकवाड बारगीर या दुसऱ्या एका सैनिकाच्या बाबतीत दरमहा रुपये १० जखम बरी होईपर्यंत व त्यानंतर अडीच रुपये रोज जखम बरी झाल्यावर वीस दिवस द्यावेत असा आदेश दिलेला होता.
बगाजी श्रीपत याच्या हस्ते ७० रुपयेची हुंडी जखमी सैनिकांच्या खर्चासाठी मोत्याजी थोरात शिलेदार याजकडे पाठवली आहे, असा उल्लेख ‘उत्तर मराठेशाहीतील सराफी धंदा’ या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासीकातील एका लेखामध्ये आला आहे. अशा स्वरूपाची उदाहरणे मराठेशाहीच्या अभ्यासात आढळतील ज्या मध्ये जखमी झालेल्या सैनिकांच्या पोटापाण्याची योग्य ती काळजी त्यांच्या वरिष्ठानी घेतलेली होती.अशा कारणामुळेच मराठेशाहीत मराठे वीर आपले प्राण पणाला लावून हिंदुस्थानात कुठेही लढायला सदैव तयार असत असे दिसते.
मराठ्यांच्या मोहिमेत नेहमी कारभारी, लेखनिक व कारकून मंडळी सुद्धा सहभागी होत असत.मृत सैनिकाच्या भावाला किंवा त्याच्या मुलाला त्याच सैन्यात नोकरी मिळत असेल काय? जरी मला या संबधीचा ठोस पुरावा ऐतिहासिक कागदपत्रात आढळला नाही तरी पण मराठे सरदारांचे त्यांच्या सैनिकांबरोबरचे वर्तन पाहिले म्हणजे याचे उत्तर ‘हो’ असेच द्यावेसे वाटते.


लेखन व संकलन: प्रमोद करजगी
संदर्भ: उत्तर मराठेशाहीतील सराफी धंदा लेखक वा.गो. काळे, महादजी शिंदे याजकडील राजकारणे:आपाजी राम दाभोलकर यांची पत्रे,भाग तिसरा,लेखांक ९६, तारीख २२जुलै१७९०, शिंदेशाहीच्या इतिहासाची साधने भाग पहिला, कोटा संस्थान येथील शिंदे सरकारचे वकील गुलगुले यांचे दप्तरातील पत्रव्यवहार, संपादक आनंदभाऊ फाळके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: