शिलंगणाचे सोने

STOTRAMALA
A Garland of Hindu Prayers

आज दसऱ्याचा निमित्ताने लिहिलेला ‘शिलंगणाचे सोने’ असे शीर्षक दिलेला हा लेख ! हे शिलंगणाचे सोने आहे मराठीतील संत साहित्याचे. आणि हे सोने लुटणारा पुरुष आहे अमेरिकेतील न्यू जर्सीचा रहिवासी एक अप्रसिद्ध डॉक्टर जस्टिन ऑबॉट (Dr. Justin Abbott)!! जन्माने अमेरिकन असणारा हा माणूस भारतातच रमला आणि आयुष्याची बरीच वर्षे त्याने महाराष्ट्रात व्यतीत केली. महाराष्ट्राच्या अनेक शहरात, खेड्यात, सुपीक दऱ्याखोऱ्यात व सौंदर्याने नटलेल्या पर्वतात तो फिरला. आणि अशी फिरस्ती करता करता महाराष्ट्रातील संत साहित्याच्या प्रेमात पडला. मराठीतील अनेक संतांच्या लिखाणाचा त्याने गाढा अभ्यास केला आणि त्या साहित्यातील त्याला मनापासून आवडलेल्या काही कविता त्याने स्वतः वेचून काढल्या आणि त्या काव्यपुष्पांचा त्याने बनवला एक सुरेख सुंदर पुष्पहार आणि अर्पण केला एका पुस्तकाच्या स्वरूपात. या पुस्तकाचे नाव आहे स्तोत्रमाला, हिंदू प्रार्थनांचा एक हार. आजपासून बरोबर ९१वर्षांपूर्वी म्हणजे सन १९२९ मध्ये प्रकाशित केलेले हे पुस्तक या अमेरिकन पाहुण्याने अवघ्या महाराष्ट्राला, मराठी संतांना, महाराष्ट्राच्या संतभूमीला अर्पण केलेले आहे. त्याने ज्या दिवशी हे पुस्तक लिहून संपवले तेव्हा तो ७५ वर्षे वयाचा ‘तरुण’ होता. मराठी संतसाहित्याने झपाटलेल्या जस्टिनने ज्या संतांचा अभ्यास केला त्यामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानदेव,नामदेव, भानुदास,एकनाथ, तुकाराम,रामदास, दिनकर,केशव, त्र्यंबक,देवदास, मोरोपंत आणि महिपती इत्यादींच्या साहित्याचा समावेश होतो.
जस्टिन यांनी उल्लेख केलेल्या काही कवींची नांवे माझ्यासारख्या अनेकांना नवीन असतील असे वाटते. त्यामुळे काहींची त्रोटक माहिती पुस्तकातून इथे दिली आहे. कवी त्र्यंबक हा एकनाथ महाराजांच्या शिष्यापैकी एक असावा. केशव नावाचे कवी म्हणजे केशवस्वामी होत. हे भागानगर (निझामाचा हैदराबाद प्रांत) येथे वास्तव्यास होते. त्यांच्या गुरुचे नाव काशीराजस्वामी. त्यांनी ‘एकादशीचरित्र’ नावाचा ग्रंथ ओवीबद्ध केला होता.
आश्चर्याची व गंमतीची गोष्ट म्हणजे देवदास यांनी रचलेले व्यंकटेश्वर स्तोत्र अमेरिकेतील सुप्रसिद्ध येल विद्यापीठातील ग्रंथालयात उपलब्ध आहे.डॉक्टर जस्टिन यांनी त्या ग्रंथालयातून ते जसेच्या तसे घेतलेले आहे.मूळ हस्तलिखितात नसलेल्या ओळी त्यांनी प्रयत्नपूर्वक वेगळ्या दिलेल्या आहेत.
या मराठीतील काव्य समजावून घेण्यासाठी त्यांना मदत केली त्यात पंडित नरहर गोडबोले हे प्रमुख होते असे त्याने कृतज्ञतापूर्वक नमूद केले आहे.
त्याने आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हंटले आहे की हे पुस्तक लिहून झाल्यावर त्याच्या मनात अनेक विचारांनी गर्दी केली होती. मी कोण आहे? गेले ७५ वर्षे मी काय केले? या जगात येऊन हे जग अधिक सुंदर होण्यासाठी मी काय कष्ट केले? ज्या हिंदुस्थानात मी आयुष्यातील बहुतांशी वर्षे घालवली त्या देशाला इतर देशातील लोकांनी मानसन्मान द्यावा यासाठी मी काय योगदान दिले? असे नाना विचार त्याच्या मनात घोळत होते. आपल्या प्रस्तावनेत तो पुढे म्हणतो की या साऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे माझ्याकडे `नाहीत, पण एक गोष्ट निश्चित ती म्हणजे मी साऱ्या जगाला भारतीय तत्वज्ञानाने भारलेली अशी भेट प्रार्थनेच्या हाराच्या स्वरूपात (Garland of Prayers) देत आहे. ही माझी भेट कृष्णाने जसे सुदाम्याचे पोहे आनंदाने स्वीकारले तसे तुम्ही स्वीकाराल याची मला खात्री आहे असे तो म्हणतो.
या पुस्तकात प्रत्येक संतांची माहिती त्याने सुरुवातीला थोडक्यात दिली आहे आणि नंतर त्या संतांच्या त्याला भावलेल्या काही कवितांचा त्याने इंग्रजीत अनुवाद दिला आहे. त्या निवडलेल्या कवितांवर त्याने आपले भाष्य केले आहे. या कविता मूळ मराठी भाषेत त्याने पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या आहेत. ‘स्तोत्रमालाशब्दार्थप्रकाश’ या परिशिष्टामध्ये कवितेतील अवघड शब्दांचे अर्थ दिलेले आहेत.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्याने ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ या उक्तीनुसार ज्ञानदेवांच्या दोन कविता घेतल्या आहेत आणि सर्वात शेवटी महिपतींची काव्यरचना घेतली आहे. कविता निवडताना देवदासांचे व्यंकटेश्वर स्तोत्र, मोरोपंतांची केकावली आणि महिपतींचे पांडुरंगस्तोत्र या गाजलेल्या काव्यांचा त्याने आवर्जून उल्लेख केलेला आहे.
साऱ्या मराठी भाषिकांसाठी हे पुस्तक म्हणजे एका परकीय माणसाने दिलेली एक अपूर्व भेट आहे असे मी मानतो आणि म्हणूनच याला ‘सोने’ म्हणतो. आणि डॉक्टर जस्टिन याने शिलंगणास जाऊन (आपल्या देशाच्या सीमा ओलांडून)मराठी संतसाहित्याचे हे तुम्हाआम्हाला ज्ञात व अज्ञात असे सोने लुटलं आहे यात शंका नाही. म्हणूनच हे एक आगळे वेगळे शिलंगणाचे सोने !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: